संस्थाध्यक्ष संदेश


अॅड.दीपक पटवर्धन      

    स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

    सस्नेह नमस्कार,


    हिंदुस्थानने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच उत्साहाने आणि राष्ट्रभावनेने साजरा केला. आता शतक महोत्सवाकडे नेणारा कालखंड सुरू आहे. या कालखंडाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अमृत काळ संबोधले आहे. देशाचा सर्वांगीण विकास होऊन हिंदुस्थान संपूर्ण विकसित राष्ट्र म्हणून जगतासमोर याव ही वाटचाल करणारा हा अमृतकाळ आहे. त्यामुळे “सबका साथ सबका विकास” हा मंत्र अमलात आणण्याचा व सामर्थ्यशाली विकसित हिंदुस्थान निर्मितीमध्ये आपल्या सर्व घटकांचा सहयोग देण्यासाठी सज्ज होण्याचा संकल्प करू या.


    सहकार जगताच्या संधी वाढत आहेत. नवनवीन संकल्पना, नव तंत्रज्ञान या माध्यमातून सहकारी पतसंस्था चळवळ अधिक सामर्थ्यशाली होत आहे. कोरोनाच्या अत्यंत भयानक आणि विपरीत स्थितीतही पतसंस्था चळवळीने संपूर्ण विश्व लॉक डाऊन मधून जात असतानाही आपल्या खेडोपाड्यातील ग्राहकांना आवश्यक आर्थिक सेवा दिल्या. गेल्या दोन वर्षात आपल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने अविरत आर्थिक सेवा देऊन पतसंस्था व्यवस्थेची उपयुक्तता अधोरेखित केली. आर्थिक चक्र ठप्प करणारा कोरोना महामारीचा कालखंड सर्वांचीच परीक्षा पाहणारा कालखंड होता. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपले अर्थचक्र गतिमान रहावे म्हणून हरसंभव प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले. विविध सेवा पुरवत आवश्यक तेथे धोरणात्मक निर्णय घेऊन कर्जदार, ठेवीदार यांचे हित जोपासले. कर्जदारांना उचित मुदत कर्ज फेडण्यासाठी देतानाच कर्ज वसुली ठप्प होणार नाही याची काळजी घेतली. आपल्या नफ्यातून कर्जदारांच्या कर्जावरील एक महिन्याचे व्याज संस्थेने भरले. हयासाठी आपण सर्व सभासदांनी निव्वळ नफ्यातून ७५ लाख रुपये खर्च करण्यास सहृदयी भावनेने मंजुरी दिलीत. आपल्या संस्थेचा हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारा होता. अनेक मान्यवरांनी, अर्थतज्ञांनी, सहकार अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती घेऊन संस्थेचे अभिनंदन केले हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.


    गत आर्थिक वर्षात संस्थेकडे उत्तम ठेवी संकलित झाल्या. कर्जवितरणाचा वेगही आवश्यक प्रमाणात राखत संस्थेने उत्तम कर्जवसुली कोणतीही सक्तीची कारवाई न करता केली. उत्तम वसुली प्रतिसाद देणाऱ्या सर्व कर्जदारांचे सहकार्य लाख मोलाचे आहे. संस्थेने या आर्थिक वर्षात सर्वच प्रकारात उत्तम कामगिरी केली. उपलब्ध निधीला सर्वोत्तम विनियोग केल्याने संस्थेचा निव्वळ नफा ६ कोटी २१ लाख झाला असून वाढत्या नफ्यातील अधिकांश भाग संस्था स्वनिधी निर्मितीसाठी वापरता आली असल्याने संस्थेचा स्वनिधी ३१ कोटी ८५ लाख झाला आहे. संस्थेचे आर्थिक स्थैर्य व आर्थिक सौष्ठव हे स्वनिधीच्या संकलनातून अधिक स्पष्ट होते. संस्थेची आर्थिक स्थिती सातत्याने उत्तम राहिल्याने या वर्षी ही १५% लाभांश संचालक मंडळाने वार्षिक सभेला शिफारस केला आहे.


    अहवाल सालातील आर्थिक वर्षात नवीन शाखा विस्तार करता आला नाही. किंबहुना कोरोना नंतरची स्थिती पाहून नवीन शाखेचा विचार आपण स्थगित केला. मात्र नव्या आर्थिक वर्षात किमान ५ नव्या शाखांना मंजुरी मिळवून किमान ३ शाखा नवीन आर्थिक वर्षात सुरु करू या दृष्टीने योजना नियोजन सुरु आहे.

    संस्थेने अहवाल सालातही अ लेखापरीक्षण वर्ग कायम ठेवला असून संस्थेची सभासद संख्या ३९,४५९ एवढी झाली आहे. ३०० सभासदांनी प्रारंभ करत ३९,४५९ इतकी सभासद संख्या ही संस्थेचा आर्थिक पाया विस्तृत असल्याची द्योतक आहे.


    सन २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षात ठेव व्याज घट हा प्रमुख मुद्दा समोर येणार असून बँकांनी ठेव दर घटवल्याने १३० कोटीच्या गुंतवणुकीवर प्राप्त होणारा परतावा घटणार असून त्यामुळे लक्षणीय उत्पन्न घटणार आहे. त्या बरोबरच कर्ज मागणी ही घटताना दिसत आहे. त्यामुळे काही धोरणात्मक बदल करत नव्याने निर्माण झालेल्या आर्थिक स्थित्यांतराशी जुळवून घ्याव लागते. या सर्व प्रक्रियेत सभासदांचे सकारात्मक सहकार्य मिळेल हा विश्वास आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २७५ कोटीच्या पुढे जातील. कर्जवितरण ही १७५ कोटीपर्यंत पोहोचेल. संस्थेच्या असलेल्या १७ शाखांमध्ये पाच शाखांची वाढ करण्याचा प्रयत्न आहे. संस्थेच्या पहिल्या पावस शाखेचे कार्यालय प्रशस्त स्वमालकीच्या जागेत प्रस्थापित होण्याचे स्वप्न येत्या काही दिवसात पूर्णत्वाला जाईल. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आव्हाने पेलत संस्था सातत्यपूर्ण वाटचाल कायम ठेवेल.


    सर्व सभासदांनी दिलेले सहकार्य अनमोल आहे ही सहकार्याची स्नेहाची साखळी आणि स्वामी स्वरुपानंदाचे आशीर्वाद या अधिष्टानावर स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थचक्र सातत्याने तेजाळत राहील हा विश्वास देतानाच सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.