स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे!

        सलग २७ वर्षे मनोगत लिहिताना एक अनोखे समाधान व आनंद अनुभवत आहे!

        माझ्या ऐन २५ व्या वर्षी लिहिलेले मनोगत मी मुद्दामुन अवलोकिले आणि मग प्रत्येक वर्षाच्या मनोगतावर नजर टाकण्याचा मोह टाळता आला नाही.सातत्याने नवेनवे उच्चांक, स्थैर्य, अबाधित ठेवत वाढत जाणारे व्यवहार, संस्थेचे विश्वासार्ह स्थान, संस्थेला मिळालेले मान मरातब, ५० रुपयांच्या भाग खरेदीसाठी केलेली आर्जव व आज कोट्यावधी रुपयांचे चेक निर्धोकपणे आणून देवून आर्जवून सांगणारे ठेवीदार हा सर्व चलचित्रपट या अवलोकनामुळे नजरेसमोर तरळून गेला. या संस्थेच्या प्रत्येक क्षणाचा स्वामी कृपा लाभलेला मी घटक आहे याचा अभिमान व समाधान या अवलोकनात अनुभवले.

        रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्राने सुरुवात करून महाराष्ट्राला गवसणी घालण्याची कामगिरी आपल्या संस्थेने केली. कै. आ. डॅा. तात्या साहेब नातू यांना अपेक्षित असलेली हि कामगिरी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या प्रेरणेतून त्यांनी हि संस्था स्थापन करून दिली ते उद्दिष्ट सफल झाले. संपूर्ण प्रतिकूल,नकारात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आज महाराष्ट्रात अग्रनामांकित संस्थेमध्ये आपलं स्थान अधोरेखित केले आहे.या संस्थेचा यशस्वी अध्यक्ष म्हणून मला खूप अभिमान वाटतो हा अभिमान सार्थ आहे.या अभिमानात कोठेही स्वची गर्वाची बाधा नाही.उलट मी आणि माझे सर्व सहकारी,संथेचे सर्व सन्मानीय सभासद, ठेवीदार,कर्जदार,सर्व हितचिंतक यांच्या सहकार्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहोत.

        एक सुंदर असं शिल्प स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रूपाने ऊभ राहील.विश्वासार्हता, शिस्त, वक्तशीरपणा, पारदर्शकता, उपक्रमशीलता, ग्राहकसेवा, अद्ययावतता अशा विविध छटांनी हे शिल्प संपन्न आहे आणि अविरतपणे वाढत जाणारे ग्राहक या उत्तम रेखाटलेल्या अर्थशिल्पाच्या सेवांचा आनंद सातत्याने घेत आहेत.

        पतसंस्था हे काळा पैसा साठविण्याचे केंद्र नाही.पतसंस्थेकडे आयकर तरतुदींना अधिन राहून असलेलाच पैसा गुंतवता येईल अशी स्पष्ट भूमिका घेत ग्राहकांमध्ये जागरुकता आणण्याचे काम पतसंस्थेने गेली ३ ते ४ वर्ष केले आणि त्या जागरूकतेचा लाभ या वर्षी पतसंस्थेला पुरेपूर झाला.महाराष्ट्रातील मोठमोठ्या पतसंस्थेच्या ठेवी कमी झाल्या मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीमध्ये सातत्यपूर्ण वाढ झाली म्हणजेच निश्चलनी करणानंतरचे आव्हान संस्थेने यशस्वीपणे पेलले हे स्पष्ट होते.वाढीव ठेवींच्या प्रमाणात योग्य कर्ज प्रमाण ठेवण्यात,उत्तम वसुलीची आपली ख्याती पतसंस्थेने या आव्हानात्मक कालखंडातही कायम ठेवली.संस्थेच्या ९ शाखांची वसुली १०० टक्के राहिली.नव्याने स्थापन झालेल्या मारुतीमंदिर शाखेमध्ये १ वर्षात १० कोटींचे ठेव संकलन झाले ही सर्व आकडेवारी आव्हानात्मक स्थितीत प्राप्त झालेल्या यशाची निदर्शक म्हणावी लागेल.

        अहवाल सालात पतसंस्थेने १२५ कोटींचा ठेव टप्पा ओलांडताना २०० कोटींचा संमिश्र व्यवसाय पार केला आणि कोकण विभाग कार्याक्षेत्राच्या पुढे जात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र संस्थेने प्राप्त केले. या बहुमानाबरोबरच अहवाल वर्षात दीपस्तंभ, बँको व प्रतिबिंब असे तीन पुरस्कार प्राप्त केले. सन २०१६-२०१७ हे वर्ष प्रतिवर्षाप्रमाणे पतसंस्थेसाठी सर्व बाजूंनी यशस्वी वर्ष ठरले हे नमूद करताना विशेष आनंद होतो.

        सन २०१६-१७ या आव्हानात्मक आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ८१ लाखांचा निव्वळ नफा प्राप्त करत नवीन अर्थकरणात नवे बदल संस्थेने सहज स्विकारून यशस्वी केले असे म्हणावे लागेल. नवीन आर्थिक वर्षात आणखीन ५ शाखा सुरु करून पुणे आणि ठाणे या दोन महानगरात पतसंस्थेचा प्रवेश यशस्वी करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.

        सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात पतसंस्थेने कर्जदारांना दिलासा देत आपले कर्जव्याजदर कमी केले तसेच व्यावसायिक कर्ज मर्यादा ६० लाखापर्यंत वाढवली.ठेवीदारांना आश्वस्त करणारा स्वनिधी १३ कोटींच्या पुढे गेला असून चालू आर्थिक वर्षात स्वनिधी १७ कोटींच्या घरात जाईल.५५ कोटींच्या बँक गुंतवणुका,९९.९७% वसुली या गोष्टी संस्थेची मजबूत, आर्थिक ताकद,स्थैर्य यांचे द्योतक आहेत.चालू आर्थिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यक्षेत्र वापरत संस्थेचे व्यवहार अधिक विस्तारत नेण्याचे आणि अर्थ जगतातील महाराष्ट्र व्यापी संस्था म्हणून नाव कोरण्याचा प्रयत्न राहणार आहे अर्थातच या प्रयत्नात तुम्हा सर्वांची साथ लाखमोलाची असेल.

        २७ वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि मी हे एक अविभाज्य असे समिकरण राहिले.संस्था सातत्याने यश शिखरावर राहिली या प्रवासात सहकारी ,संचालक,अधिकारी,कर्मचारी,प्रतिनिधी,ग्राहक वर्ग,हितचिंतक या सर्वाचे सक्रीय सहकार्य मोलाचे राहिले.

        स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे हे व्यापक स्वरूप अधिकाअधिक तेजःपुंज होत सहकार चळवळीत हि संस्था महामेरू ठरो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करून यशोगाथेचे हे २७वे पुष्प सादर करतो.