जिल्हाध्यक्ष पदाबाबत भाजपमध्ये दोन मतप्रवाह जिल्ह्याबाहेरचा अध्यक्ष नको असा काहींचा सूर

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष निवडीबाबत भाजपचे लोकसभा म तदारसंघाचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी घेतलेल्या बैठकीत दोन मतप्रवाह मांडले गेले. एकीकडे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातलाच असावा असा सूर काहींनी लावला तर अध्यक्ष कुठला यापेक्षा संघटना वाढवणे महत्त्वाचे असल्याचे काहींनी सांगितले.

सध्या भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन काम पहात आहेत. त्यांच्या कालावधीत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. १७२ ग्रामपंचायतीत भाजपचे सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश आले आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंचही निवडून आले आहेत. बुथ समित्या त्यांच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात स्थापन केल्या गेल्या आहेत. भाजपने देवरुखमध्ये स्वतःच्या जागेत कार्यालयही सुरू केले आहे.

आता ॲड. पटवर्धन यांना प्रदेश भाजपमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे दक्षिण जिल्हाध्यक्ष कोणाला करावे याबाबत पदाधिकाऱ्यांचे नेमके काय म्हणणे आहे? या पदासाठी कोण इच्छुक आहे? या संदर्भातील चाचपणी करण्यासाठी उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे नुकतेच रत्नागिरीत आले होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून विद्यमान सरचिटणीस राजेश सावंत तसेच सचिव वहाळकर यांची नावे पुढे आली. आपण अध्यक्षपदी काम करण्यास इच्छुक असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले. सध्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक असलेले मात्र मुळचे हातखंबा गावचे प्रमोद जठार यांना संधी द्यावी का? अशी विचारणा यावेळी काळसेकर यांनी केली. त्यावर काहींनी विरोध दर्शवला. तर राजू भाटलेकर, राजीव कीर यांनी अध्यक्ष कुठलाही असो संघटना मजबूत करण्याचे काम झाले पाहिजे, असा सूर मांडला.

दरम्यान, या बैठकीनंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी अस्वस्थता पहायला मिळाली. जिल्हाध्यक्ष स्थानिकंच असायला हवा असा सूर काहींनी मांडला. सह्यांची मोहीम राबविण्याचा सल्लाही एक-दोघांनी दिला.