सन २०२१-२२ या आव्हानात्मक आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक भरारी, २५० कोटींचा ठेव टप्पा
सन २०२१-२२ वर्ष अर्थकारणाच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. कोरोना लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावले होते. अर्थकारणात कमालीची अनिश्चितता. आली होती. अशा अस्थिर कालखंडात अर्थव्यवहार वाढवणे आव्हान होते. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने हे आव्हान लिलया पेलले असून प्रतिवर्षाप्रमाणे उत्तम आर्थिक रिझल्ट प्राप्त केला आहे, अशी माहिती स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
२१-२२ आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २५० कोटी ३१ लाख तर कर्ज १७० कोटी ५१ लाख झाले असून संस्थेच्या गुंतवणुका ११९ कोटी ६९ लाख झाल्या असून संस्थेचे निधी २९ कोटी पार गेले आहेत. तर स्वनिधी ३१ कोटी ८५ लाख, मालमत्ता ३ कोटी ५५ लाख झाल्या आहेत. २१-२२ या कोविड प्रभावी वर्षातही संस्थेने कर्जदारांची वसुली नियमित भरण्याचे कर्तव्य नेटाने बजावल्याने ९९.५१ टक्के विक्रमी वसुली झाली आहे. संस्थेचा नेट एनपीए शुन्य टक्के ठेवण्यात संस्था यशस्वी झाली. १७ शाखांपैकी ८ शाखांची वसुली १०० टक्के झाली असून पावस, राजापूर, खंडाळा, नाटे या शाखाही जवळजवळ १०० टक्केच्या समीप आहेत.
संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून चालू वर्षी ६ कोटी २१ लाख निव्वळ नफा प्राप्त झाला असून खेळत्या भांडवलाच्या २ टक्के प्रमाणात नफा आहे. नफ्याचे हे प्रमाण आर्थिक संस्थेसाठी लक्षणीय आहे. सर्व प्रकारच्या तरतुदी केल्यानंतर राहिलेला निव्वळ नफा संस्थेच्या उत्तम व्यवस्थापनात कौशल्य व उपलब्ध निधीचा पर्याप्त वापर यामुळे शक्य झाला आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये २४ कोटींनी वाढ झाली. संस्थेच्या १७ शाखांपैकी ८ शाखांमधील ठेवींमधील वाढ १ कोटीपेक्षा अधिक आहे. तर मारुती मंदिर शाखेमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५ कोटी ३८ लाखांच्या ठेवी वाढल्या आहेत. एकूण २५० कोटी ३१ लाखाच्या ठेवी ७३७८७ ठेव खात्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहेत. जमा संस्थेची ग्राहक सभासद संख्या ४०८९० झाली असन सर्व पकारत्त्या कर्जदारांची संख्या २२७३० झाली आहे. ३१ वर्षाच्या अखंड वाटचालीत विश्वासार्ह, ग्राहकाभिमुख, पारदर्शकता, अद्यायावत तंत्रज्ञानानाने युक्त अशी ओळख दृढ केलेली स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सहकार क्षेत्रात सहकार तत्त्वाला व्यावसायिकतेची जोड देत मार्गक्रमण करत आहे. व्हॉट्सॲपद्वारे ग्राहकांना बॅलन्स व खातेव्यवहार यांची माहिती मागताक्षणी देणारी स्वामी स्वरूपानंद ही कोकणातली एकमेव संस्था आहे.
स्वरूपानंद पतसंस्थेने सोशल वेल्फेअर फंडातून १३ लाख ७१ हजार खर्च कोरोनाग्रस्त कालावधीत सामाजिक कार्यावर केला आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. ठेवीदारांना विश्वासार्ह व सुरक्षित अशी गुंतवणूक करता यावी, हे ब्रीद नजरेसमोर ठेवून संस्थेचे कामकाज चालत आहे.
