ॲड. पटवर्धनांवर शुभेच्छांचा वर्षाव

भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस छोटेखानी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालय या ठिकाणी ॲड. पटवर्धन यांना पुष्पगुच्छ देऊन साऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

गेल्या दोन-अडीच वर्षांत भाजपमध्ये आलेले नवचैतन्य, कार्यकर्त्यांना मिळालेले बळ यामुळे भाजप कार्यकर्ते आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर ॲड. पटवर्धन यांना रत्नागिरी जिल्हा भाजप संपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यात आल्या.

आगामी निवडणुकीत यश मिळणे आवश्यक असून, त्या दृष्टीने रणनीती आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम करा, अशा सूचना ॲड. पटवर्धन यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांचे वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी अभीष्टचिंतन करून साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेल्या अॅड. पटवर्धन यांना बँकेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात शुभेच्छा दिल्या. सहकारामध्ये ॲड. पटवर्धन यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून संचालक, कर्मचाऱ्यांनी त्यांना सुयश चिंतले.

त्यानंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ॲड. पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात उपस्थित होते. येथे शहर, परिसरातील विविध बँका, पतसंस्था, राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. स्वरूपानंद पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, उपाध्यक्ष माधव गोगटे आणि संचालक मंडळ, कर्मचारी, शाखा व्यवस्थापक, पिग्मी प्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनुराधा पटवर्धन, वैभव पटवर्धन आदी उपस्थित होते.