स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. पटवर्धन बिनविरोध

येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर आज संचालक मंडळाची पहिली सभा झाली. सलग तिसऱ्यांदा ॲड. दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी, तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात मंगळवारी (ता. ९) दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या संभेमध्ये ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, बापट, गोगटे, संतोष प्रभू, शरदचंद्र लेले, प्रदीप कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. या सर्व संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारीसुधीर कांबळे यांनी घोषित केले.

सलग तिसऱ्यांदा ॲड. पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले ॲड. पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार

क्षेत्राचा श्रीगणेशा केला. अनेकविध नवे आर्थिक उपक्रम घेऊन नवनवीन योजना घेऊन स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ग्राहकांसमोर येईल. एखाद्या आर्थिक संस्थेचे अध्यक्षस्थान सलग २० वर्ष भूषवायला मिळणे, ही गोष्ट खूप बोलकी आणि माझ्यासाठी अमूल्य असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.