स्वामी स्वरुपानंद पतसंस्था अध्यक्षपदी दीपक पटवर्धन

येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा दिनांक ९ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये ॲड. दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, संतोष प्रभू, शरदचंद्र लेले, प्रदीप कुलकर्णी आदी नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे यांनी घोषित केले.

सलग तिसऱ्यांदा ॲड. दीपक पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले ॲड. दीपक पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला. तिसऱ्यांदा त्यांची अध्यक्षपदी निवड होताच संचालक मंडळांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


"माझ्यावर दर्शवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक दुतगतीने वाढवण्यासाठी संचालकांच्या साथीने यापुढेही काम करणार आहे. शाखा विस्तार, ३०० कोटींच्या ठेवी, २०० कोटींचे कर्ज हे उद्दिष्ट ठेवत आगामी काळात स्वरूपानंद पतसंस्था काम करणार आहे. सहकार क्षेत्रात मिळालेल्या या सातत्यपूर्ण संधीचा उपयोग करत विश्वासार्ह, रचनात्मक, अर्थविश्व उभारता आले याच समाधान लाखमोलाचे आहे. अनेकविध नवे आर्थिक उपक्रम घेऊन नवनवीन योजना घेऊन स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ग्राहकांसमोर येईल."
- ॲड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष