स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा सोमवारी नव्या स्ववास्तूत स्थलांतरित झाली. या सोहळ्यास पावस दशक्रोशीतील पाचशे ग्राहकांनी शाखेला भेट देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन तसेच संचालक, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन अॅड. पटवर्धन यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष माधव गोगटे, गोळपच्या सरपंच मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई, संचालक अजित रानडे, जयप्रकाश पाखरे, शरदचंद्र लेले, प्रसाद जोशी, राजू सावंत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, पावस दशक्रोशीत पतसंस्थेचे ९ हजार ग्राहक असून २१ कोटी ८८ लाखांची कर्जे दिली आहेत. ही कर्जवसुली १०० टक्के आहे.
नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद होतोय. आपले आचरण, विचार चांगले असतील तर स्वामी स्वरूपानंदांसारख्या थोर विभूतींचा आशीर्वाद मिळतो. हा आशीर्वाद स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला लाभला आहे. स्वामींच्या
कृपाशीर्वादामुळे पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. पावसमध्ये शाखा व्हावी, याकरिता अनेक मंडळी भेटण्यास आली. त्यावेळी अशी शाखा असते ही संकल्पना रुजली नव्हती. रितसर परवानगी घेऊन आठच दिवसांत शाखा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ग्राहकांचे लाखमोलाचे सहकार्य लाभत आहे.
आज या विश्वासाच्या बळावर २००० चौरस फुटाच्या मोक्याच्या जागेत स्थलांतर केले आहे. ग्राहकाला देव मानून उत्तम सेवा देत आहोत. ग्राहकांचा वेळ वाचला पाहिजे म्हणून तत्पर, अचूक, विश्वासार्ह सेवा दिली जाते. पतसंस्था
जगतात ठेववृद्धी मास ही संकल्प १९९४ पासून स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने रूजवली. पावस' पंचक्रोशीतील विकासचक्र अधिक गतिमान करण्याचा आपला संकल्प आहे असे ते म्हणाले.
यावेळी प्रगतशील शेतकरी जयंत फडके यांनी पावस दशक्रोशीत आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम यांवर प्रक्रिया उद्योग सुरू होण्याकरिता पतसंस्थेने मदत करण्याचे आवाहन केले. रमण दळी यांनी प्रामाणिकपणा, तत्पर व उत्तम सेवा देणारे कर्मचारी यांच्यामुळे ग्राहक समाधानी असून पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या अडीअडचणी
सोडवण्यासाठी ग्रामस्थांना मदत केली व संस्थेची अशीच भरभराट होवो, अशा शुभेच्छा दिल्या. लाईक फोंडू यांनी ग्राहकांचे समाधान होईल असे कर्मचाऱ्यांचे वागणे असून संस्थेचे कामकाज दुसऱ्या मजल्यावरसुद्धा सुरू होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. विश्वास दामले यांनी पतसंस्था व अॅड. पटवर्धन यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
पतसंस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणारे अक्रम नाखवा, इंटेरियर डिझायनर प्रशांत माचकर, गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, करीम सावकार, हनिफ मुल्ला, रमण दळी, जयंत फडके, लाईक फोंडू, फकीरपांढरे, मजिद काझी, इम्रान हाजू, जुनेद फोंडू, नाना पावसकर, प्रशांत फडके, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे, रणजित सुर्वे, अमोल पाथरे, पावसचे उपसरपंच प्रवीण उर्फ बाय शिंदे, विजय देसाई, विक्रांत रांगणकर, मनोहर लेले, कांचनकुमार काळे, रघुनाथसिंह चुंडावत, मंगेश भोजने, अरविंद पवार, प्रकाश पवार, समीर हातोडकर, बाबाशेठ साळवी यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन व्यवस्थापक मोहन बापट यांनी केले. यावेळी उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, पावस शाखा व्यवस्थापक विशाल सावंत व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे स्वागत केले.
